इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष : दोषी कोण ?


DEFENCE & GEO-POLITICS, FREEDOM, POLITICS, मराठी / Monday, May 17th, 2021

लेखक : सागर वाघमारे

अॉटोमन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर 1919 मध्ये आजचा इस्रायल व पॅलेस्टाईन दोन्हीचा भूभाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला होता.अल्पसंख्याक ज्यू व बहुसंख्याक पॅलेस्टाईन अरब तिथे एकत्र राहत पण तिथे देखील त्यांच्यात त्याच धार्मिक व वांशिक दंगली ज्यू आणि अरब यांच्यामध्ये घडत ज्या भारतात हिंदू व मुस्लीम यांच्यात स्वातंत्र्यपूर्व काळात घडत. ज्यू आणि अरब दोन्ही समुह पॅलेस्टाईनच्या भुभागावर आपला ऐतिहासिक हक्क सांगतात. ज्यू आणि पॅलेस्टाईन अरब संघर्ष हा धार्मिक व वांशिक आशा दोन्ही प्रकारचा आहे. सर्व अरब हे मुस्लिमच असतील अस नाही पण बहुसंख्य अरब हे मुस्लिमच आहेत.

20 व्या शतकात जगभरात ज्यूं लोकांवर अत्याचार सुरू झाल्यानंतर ज्यूंना त्यांच भविष्य सुरक्षित करायच असेल तर ज्यू राष्ट्राची गरज त्यांच्या विचारवंतांना वाटत होती.ज्यू फक्त एक धर्म नसून ते एक राष्ट्र आहेत हा धार्मिक राष्ट्रवाद म्हणजे झायोनिझम आहे. या झायोनिझमच्या चळवळीमुळे दुसर्‍या महायुद्धानंतर अनेक ज्यू ब्रिटिश पॅलेस्टाईनमध्ये येऊन स्थायिक होऊ लागले तसेच याच सुमारास पॅलेस्टाईन मधील अरब वंशीय देखील आपल्याला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून पाहू लागले होते त्यामूळे स्थानिक अरबांच्या जमिनीच्या मालकी हक्कावरून ज्यू लोकांच्या सोबत हिंसक झडपा देखील वाढत गेल्या. भारतातील आसाममध्ये “असामी विरूद्ध बांग्लादेशी” जो वाद आहे तसाच हा वाद आहे. पॅलेस्टाईन मधील अरब ज्यूंच्या या झायोनिझमच्या चळवळीला नविन युरोपीय साम्राज्यवाद व वंशवाद मानतात. त्यामूळे त्यांच्यात हिंसक संघर्ष सुरू झाला.

हा जामतावादी तेढ सोडविण्यासाठी ब्रिटिश सरकारने भारतासाठी जसा फाळणीचा निर्णय घेतला तसाच पॅलेस्टाईनच्या फाळणीचा घेऊन काही भूभाग युनायटेड नेशनच्या मदतीने ज्यूंना देऊ केला त्याला “ज्यू इस्रायल” म्हणतात तर काही भूभाग अरबांना दिला त्यालाच “अरब-पॅलेस्टाईन” म्हणतात तर मुस्लिम, ज्यू व ख्रिश्चनांसाठी पवित्र असलेले जेरूसलेम शहर युनायटेड नेशन मार्फत आंतराष्ट्रीय नियंत्रणात ठेवण्याचा निर्णय घेतला. आशाप्रकारे ज्यूंसाठी इस्रायल व अरबांसाठी पॅलेस्टाईन हे दोन देश जन्माला आले व पॅलेस्टाईनला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य देखील मिळाल.

पण गमत इथे आशी आहे कि पॅलेस्टाईन मधील व जॉर्डन, सिरिया, इजिप्त, इराकसारख्या अरब देशांनी मात्र इस्रायलच स्वतंत्र अस्तित्वत मान्य केलं नाही आणि सगळ्या अरब राष्ट्रांनी मिळून इस्रायल विरोधात १९४८-४९ मध्ये पहिलं युद्ध सुरू केल. या युद्धात इस्रायलने अरबांचा परभाव केला व पॅलेस्टाईनच्या जवळपास सगळ्या देशावरच ताबा मिळवला. युनायटेड नेशनच्या १९४७ च्या प्लॅन नुसार ब्रिटश पॅलेस्टाईनचा ५७% भुभाग ज्यूंना इस्रायल देशाच्या निर्मितीसाठी दिला होता पण या पहिल्या युद्धानंतर ७७% पॅलेस्टाईनचा भूभाग इस्रायलने आपल्या ताब्यात घेतला तर गाझा पट्टीवर इजिप्त आणि वेस्ट बँकवर जॉर्डनचा ताबा आला. इस्रायलने कब्जा केलेल्या पॅलेस्टाईनच्या भुभागतून इस्रायलने लाखो पॅलेस्टाईन अरबांची हकालपट्टी केली तर काही अरब आजही ज्यूंसोबत इस्रायलमध्येच शांततेत राहत आहेत. पुढे १९६७ मध्ये जे ६ दिवसांच “इस्रायल विरूद्ध अरब देश” असं दुसरं युद्ध घडल तेंव्हा इस्रायलने पॅलेस्टाईन अरब जिथे बहुतांशी राहतात तो जॉर्डन नदीच्या पश्चिमेकडचा “वेस्ट बँक” नावाचा भुभाग आणि पश्चिम जेरूसलेमवर देखील युद्ध जिंकून नियंत्रण मिळवल तर पूर्व जेरूसलेम जॉर्डनच्या ताब्यात होतं त्यावरही मागच्या वर्षीच इस्रायलने आपला हक्क प्रस्थापित केला आहे.

हा झाला ढोबळ इतिहास.

ज्यू विरुद्ध अरब हा संघर्ष फक्त फक्त राजकिय व वांशिक नसून धार्मिक देखील आहे. वेस्ट बँक जेंव्हा इस्रायलच्या ताब्यात आला तेंव्हा जगभरातील व इस्रायलमधील ज्यू वेस्ट बँकमध्ये बेकायदेशीर स्थायिक होऊ लागले. त्यांनी वेस्ट बँकच्या मोकळ्या जागांवर कब्जा केला, काही जागा अरबांकडून बाजारभावापेक्षा दुप्पट तिप्पट किंमत देऊन खरेदी केल्या. इस्रायल सरकारने देखील सबसिडी देऊन इथे स्वस्त घरांची निर्मिती सुरू केल्याने अनेक इस्रायली इथे घरं विकत घेऊ लागले. अरबांच्या भूभागात ज्यू स्थायिक होऊ लागल्याने दंगली व हिंसा पून्हा सुरू झाल्या. याचमूळे “इंटीफाडा” चळवळ देखील 80 च्या दशकात सुरू झाली. इंटीफाडा म्हणजे इस्रायल विरोधात उठाव किंवा बंडखोरी. यातून अरबांच्या हक्कांच्या रक्षणासाठी व मागणीसाठी “हमास” सारख्या अतिरेकी संघटना देखील जन्माला आल्या.

वेस्ट बँक हा पॅलेस्टाईनचा भूभाग असल्याने ज्यूंनी तिथे स्थायिक होणं, आपल्या वसाहती निर्माण करणं युनायटेड नेशने देखील बेकायदेशीर ठरवलं आहे. पण वेस्ट बँकेमध्ये जे लाखो ज्यूंनी आज आपल्या वसाहती निर्माण केल्या आहेत. ते तिथून माघार घेतील याची शक्यता नव्हती ना इस्रायल सरकारचीही तशी इच्छा असावी. दोन्ही बाजूने होणारी हिंसा रोखून शांती प्रस्थापित करण्यासाठी युनाईटेट नेशने इस्रायल व पॅलेस्टाईनची PLO (Palestine Liberation Organization

) नावाची संघटना यांना सोबत घेऊन 1993 मध्ये एक करार केला त्याला ते “ओस्लो करार” म्हणतात.या करारानुसार वेस्ट बँकचा भुभाग त्यांनी 3 पद्धतीने विभाजित केला-

“अ” भाग पूर्णपणे पॅलेस्टाईनच्या ताब्यात देण्यात आला
“ब” भाग एकत्रितपणे पॅलेस्टाईन व इस्रायल दोघांच्या ताब्यात देण्यात आला
“क” भाग पूर्णपणे इस्रायलच्या ताब्यात देण्यात आला.

पण दुर्दैवाने पॅलेस्टाईन अरबांनी याही कराराला मान्यता दिली नाही व हिंसा कायम सुरूच राहिली. पॅलेस्टाईन मधील अरबांच्या मते “इस्रायली नागरिक ज्या भागात स्थायिक झाले तिथे वेस्ट बँकमधील उपजाऊ जमिन आहे तसेच जॉर्डन नदी सारखे मुख्य पाण्याचे स्त्रोत आहेत व या ओस्लो करारामुळे ज्यूंना पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमधील आमच्या हक्काच्या नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळाल आणि आम्ही पॅलेस्टाईन अरब त्यामुळेच दुष्काळी परिस्थितीत जगत आहोत!” वेस्ट बँकमध्ये ज्यूंच्या आशाप्रकारच्या स्थायिक होण्यामूळे पॅलेस्टाईन लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. वेस्ट बँकमधील अनेक रस्ते हे फक्त इस्रायली लोकांसाठीच राखीव आहेत.पॅलेस्टाईनमधील लोकांना तिथून मुक्त प्रवास करता येत नाही. इस्रायलने अनेक ठिकाणी आपले मिलिटरी चेक प्वाईंटस उभारले आहेत. यामूळेही पॅलेस्टाईन अरब व इस्रायल संघर्ष चिघळला आहे.

खरतर अरब हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंतांप्रमाणे अखंड पॅलेस्टाईनवाले आहेत. त्यामुळे ते इस्रायलच देखील स्वतंत्र अस्तित्वात कधीच मान्य करत नाहीत व केलं देखील नाही. १९८८ च्या “हमास”च्या प्रतिज्ञापत्रकानूसार ज्यू हे मुस्लिम व इस्लामसाठी खतरा आहेत आणि ही ज्यू मेंढर कधीही शांतीत जगूच नयेत या विचारांची हमास संघटना आहे तर PLO च्या १९६४ च्या चार्टरनूसार इस्रायलच अस्तित्व बेकायदेशीर आहे.

तर दुसरीकडे अरबांसोबत शांतेत राहायच असल्याने इस्रायल पॅलेस्टाईनच स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मान्य करत असला तरी त्यांची कृती त्याप्रमाणे राहिली नाही. पॅलेस्टाईनचा भूभागवर आज इस्रायलच जे नियंत्रण आहे त्याला ते आंतराष्ट्रीय कायद्याच कारण देत जस्टीफाय देखील करतात. म्हणजे तूम्ही एखाद्या देशासोबत कायम युद्धजन्य परिस्थितीमध्ये असाल तर त्या देशाच्या भूभागवर तूम्ही युद्ध करून नियंत्रण मिळवू शकता.

६ दिवसांच्या युद्धानंतर इस्रायलने आपल्याच देशाच्या आकारापेक्षा मोठा व पेट्रोलियमचे साठे असणारा इजिप्तचा सेनाईचा भूप्रदेश देखील जिंकून घेतला होता पण इजिप्त सोबत शांतेत राहण्यासाठी १९७३ मध्ये “कँप डेविड” नावाचा शांती करार करुन तो भूप्रदेश त्यांनी परत देऊन टाकला तसच सिरियाच्या गोलन हाईट्स पण परत केल्या. तसेच इस्रायलने गाझा पट्टीतून आपले सैन्य व इस्रायली वसाहती देखील संपुष्टात आणून माघार घेतली आहे. आज गाझा पट्टी हमास या अतिरेकी संघटनेच्या नियंत्रणाखाली आहे आणि इस्रायलवर मिसाईल हल्ले इथूनच होत असतात.

विषय जमिनीचा व साम्रज्यवादाचा असता तर इस्रायलने हे भुभाग कधीच वापस केले नसते ना सपरेट “ज्यू नेशन” तयार करण्यासाठी पॅलेस्टाईनच्या भूभागची गरज पडली असती पण विषय आहे तो धार्मिक इतिहासाचा!

ज्यूंसाठी वेस्ट बँक व त्या भागातील जेरूसलेम वगैरे धार्मिकदृष्टीने पवित्र जमिन आहेत म्हणून जगभरातील ज्यू बेकायदेशीररीत्या देखिल तिथे स्थायिक होण्यास येत आहेत. अर्थातच तिथे स्थायिक होणार्‍या सर्वच ज्यू लोकांचा उद्देश धार्मिक नाही तर काहींचा उद्देश ज्यू राष्ट्रवाद देखील आहे. ते ज्यू इस्रायलसाठी जास्तीत जास्त जमिन बळकावू पाहात आहेत. वेस्ट बँकमध्ये स्थायिक होणं म्हणजे आपल्या पूर्वजांचा पवित्र प्रदेशात व पवित्र जेरूसलेम मंदिराच्या जवळ असण आहे. इस्रायल सरकार आशा बेकायदेशीर रहिवाशांवर कारवाई करते पण काही लोकांच्या मते आंतराष्ट्रीय स्तरावर आपली इमेज चांगली ठेवण्यासाठी ती कारवाई फक्त दिखावटी असते. वेस्ट बँकमध्ये जसजसे ज्यू लोकं स्थायिक होत आहेत तसतसा संघर्ष अजूनच जास्त वाढत आहे. या संघर्षात दोन्हीकडचे हाजारो लोकं मारले गेले आहेत. दोन्ही समूहातील हा संघर्ष थांबविण्यासाठी “द्वी राष्ट्रा”ची संकल्पना मांडण्यात आली आहे पण हि संकल्पना फक्त थेअरीमध्ये कागदोपत्री चांगली वाटत आहे पण ती वास्तविकतेत उतरवण तितकच आज गुंतागुंतीच बनल आहे.

भारतीय हिंदुत्ववादी इस्रायलच्या बाजूने उभे राहिलेले दिसतात तर पुरोगामी वर्ग पॅलेस्टाईनच्या बाजूने. खरतर इथे हिंदुत्ववाद्यांनी पॅलेस्टाईन व ज्यू दोघांच्या बाजूने उभं राहिल पाहिजेय कारण दोघांना हिंदुराष्ट्रवाद्यांप्रमाणे धार्मिक राष्ट्रच हवं आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पॅलेस्टाईनला ऐतिहासिक भेट दिली आहे पण हिंदुत्ववादी ज्यूंची बाजू बहुसंख्य पॅलेस्टाईन अरब हे मुस्लिम असल्याने फक्त मुस्लीम द्वेषातून घेताना दिसत आहैत तर पुरोगाम्यांनी दोन्हींची बाजू न घेता सत्याची व न्यायाची बाजू घेत दोन्हीकडचा अतिरेकी राष्ट्रवाद थांबविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेय पण दुर्देवाने हे

देखील होत नाही. हिंदुत्ववादी ज्यूंच्या बाजूनै असले म्हणजे पुरोगाम्यांनी अॅटोमॅटिक पद्धतीने अरब पॅलेस्टाईनच्या बाजूने उभं असण हे शास्त्र बनल आहे.

आपल्या खाजगी मालकिची जागा सोडून इतर जागेवर देखील जनता जेंव्हा “आपला देश” म्हणून किंवा आमच्या देवाने ती जागा आम्हाला देऊ अस वचन दिल्याने किंवा तिथे आमचे पूर्वज कधीतरी वास्तव करत होते म्हणून आजही ते आपला हक्क दाखवू लागतात तेंव्हा हिंसा घडते, युद्ध सुरू होतात व निष्पाप लोकं मारली जातात. माणूस या काल्पनिक राष्ट्रवादासाठी कोणती निच्चतम पातळी गाठू शकतो याची उत्तम उदाहरण म्हणजे इस्रायल पॅलेस्टाईन हा संघर्ष आहे तसेच भारत पाकिस्तान काश्मिर संघर्ष,चीन तिबेट व इतर देश यांचे अनेक संघर्ष देखील आहेत. माणूस प्राणी अजूनही आदिमकालीन समुहवादी मानसिकतेतच जगत आहेत यामूळे आशाप्रकारच्या अनेक समस्या आजही जगात अस्तित्वात आहेत.

लिबरल विचारवंत लुडविग वॉन मिसेस म्हणतात त्याप्रमाणे “ज्यांना कुणाला राष्ट्रा राष्ट्रांमध्ये शांती हवी आहे त्याने राज्यसंस्थेच्या शक्तीला आधी कठोर नियंत्रणात ठेवून त्यांची शक्ती कमी करावी त्याशिवाय जगात शांती नांदू शकणार नाही. शांती प्रस्थापित करण्यासाठी फक्त शांती करार करणं पुरेस नाही तर अशांती ज्या विचारांमूळे पसरते ते विचारांना देखील मुळांपासूनच उपटून टाकले पाहिजेय” आणि इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षात मूळ आहे तो राज्यसंस्थांनी पोसलेला काल्पनिक राष्ट्रवाद!

We would love to hear your thoughts on this